Ad will apear here
Next
श्यामची आई (एका बेस्टसेलर पुस्तकाचे मनोगत)
आई, एक अशी व्यक्ती केवळ जिच्यामुळे आपण हे सुंदर जग बघू शकतो.. नवनिर्मिती आणि सृजनाची शक्ती ही ईश्वरानंतर त्याने जर कोणास प्रदान केली असेल तर ती आई.. मनुष्यरुपी देहास या जगात अवतरीत करणारी एकमेव शक्ती म्हणजे आई.. जिच्या अधरी अमृत आणि नयनी पाणी असते ती स्त्री जन्म प्राप्त झालेली एकमात्र व्यक्ती म्हणजे आई. श्यामची आई हे जगातील कुठल्याही आईचे प्रातिनिधिक स्वरूप आहे का? तर नाही.. पण आई कशी असावी किंवा असली पाहिजे याच मूर्तिमंत उदाहरण आपल्याला ज्या आई कडे बघून मिळतं, त्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर, श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व अर्थातच साने गुरुजी यांची आई. लाडाने तिला बयो म्हणत असत, पण ती फक्त श्यामची आई झाली का? नाही तर ती अख्ख्या जगाचीच बयो होती. पुस्तकात असणाऱ्या या ओळी भविष्यात किती सार्थ आणि ख-या ठरतात. कारण आता आपण हे बेस्ट सेलर पुस्तक व त्याचं अंतरंग पडताळतोय.. पडताळतोय हा शब्द चुकीचा ठरेल. ते वाचताना त्या पुस्तकात मंत्रमुग्ध होऊन हरवून जात परत स्वतःला चाचपडतोय असं म्हणणं काहीसं योग्य ठरेल. 

कृष्णाचा मित्र सुदामा याला जसे अपार कष्ट आणि अठरा विश्व दारिद्रय होतं अगदी तशीच काहीशी अवस्था या श्यामच्या आईची, बयोची होती. पण अशा बिकट परिस्थितीत सुद्धा तिने कोणापुढे कधी हात पसरले नाही किंवा श्यामला पसरू दिले नाहीत. ''देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे,घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे'' ह्या विं.दा.च्या कवितेतील ओळीच आठवतात. देणा-याचे हात म्हणजे दान किंवा काहीतरी देत राहण्याची वृत्ती घ्यावी. आपल्याकडे काहीही नसताना देखील जगाला फक्त देत राहणारी श्यामची आई ही जणू साक्षात "गजांत लक्ष्मी"च होती. आपण जगाला सतत काहीतरी देत राहावे, नुसती घेऊपासरी वृत्ती ठेऊन आपण या जगाचे मिंधे होऊ नये अशी शिकवण देणारी श्यामची आई..पाप हे क्षणापुरते हसते व अनंतकाळपर्यंत रडते. त्यामुळे चांगले काम करताना लाज मुळीच बाळगू नये, त्याऐवजी ही लाज आपण पाप करताना बाळगायला हवी असे सांगणारी, या जगात जे काही कराल ते अत्यंत नीटनेटके व यथासांग करा, अर्धवट किंवा थातुरमातुर काही नको. जगातली पुष्कळ दुःखे ही ह्रदयात असलेल्या दारिद्रयामुळेच उत्पन्न झाली आहेत. ह्या वाक्याची उकल करून सांगायची झाली तर पुस्तकातील एक संदर्भ नक्कीच देता येईल. पायाला घाण किंवा माती लागू नये म्हणून जसा जपतोस तसेच मन दूषित होणार नाही याची सुद्धा भविष्यात काळजी घे ही लहानपणीच श्यामला दिलेली शिकवण. 

श्यामसाठी त्याची आई ही साक्षात भगवंतच होती, जिला बघितल्यावर त्याची सर्व दुःखे हरपत असत. आपल्या मुलाला पोहता येत नाही म्हणून श्यामला धपाटे देऊन मित्रांकरवी विहिरीत ढकलणारी किंवा त्यात उडी घेण्यास प्रवृत्त करणारी प्रसंगी कठोर वाटते. पण आजकालच्या जगात इतके गुळूमूळू राहून चालायचे नाही. जो मुलगा अंगणात असलेल्या विहिरीत उडी घेण्यास घाबरतो तो या भवरोगाने ग्रासलेल्या अथांग महासागरात कसा तरुन जाईल या काळजीपोटी ती कठोर होते आणि वरवर रागे भरते. आपला मुलगा आत्ता रडला तर चालेल पण तो भविष्यात रडता कामा नये किंवा जगाने त्याला नावे ठेऊ नये हीच भावना त्यामागे होती. त्यामुळे श्यामची आई ही त्याच्यासाठी संतच होती. संत जसे आपले बोट धरून या भवसागरात एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला वाट दाखवत आपले मार्गक्रमण सुरू ठेवतात अगदी तसेच श्यामची आई त्याला घडवत होती.श्यामची आई अशी होती म्हणूनच बालपणात किंवा भविष्यात अनेकदा सद्गतीत हृदयाचा श्याम आपणास बघायला मिळतो. बाहेरच्या जगात वावरताना आपलं कौतुक, वाहवा किंवा स्तुतीसुमने गायली जावीत या उद्देशाने केलेलं कुठलंही काम हे श्यामच्या आईसाठी त्याज्यच होय. याचा संदर्भ दुर्वांची आजी या कथेत सापडतो. पण सासु-सुनांमधील भांडणे ही एखाद्या डेली सोप प्रमाणे नव्हे तर श्यामची आई पुस्तकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे असावीत असं वाटतं. अत्यंत क्षणिक राग आणि तो व्यक्त करण्याची पद्धत सुद्धा अतिशय गुणात्मक. भांडण संपल्यावर लगोलग आपल्या सासूची माफी मागणारी सून, आणि तितक्याच उदात्त अंतःकरणाने तिला माफ करणारी व शतायुषी हो असा शुभाशीर्वाद देणारी ही सासु-सुनेची अदभुत जोडी आत्ताच्या काळात एकमेकींच्या नावाने सतत मरतोडे घालणा-या सासवासुनांच्या जमान्यात बघायला मिळणं केवळ दुर्लभ! वाटेत असलेल्या वाटसरू महारीणिला मदत करून तीच पोट भरणारी श्यामच्या आईने तत्कालीन कर्मठपणावर घाव घातला आहे. पांडुरंगाची भक्त ही यशोदा तिच्या कृतीतून, आचरणातून शोभून दिसते. तो पांडुरंग जसा सर्वांचा झाला तसेच आलेल्या प्रत्येकाला आपलं म्हणत ही माऊली सर्वार्थानेच जगाची बयो ठरली. अशा बयोवर कितीही बायोपिक काढले तरी त्याला साक्षात श्यामच्या आईची सर ही असूच शकत नाही. अहंकाराच्या अगणित राशी वितळवण्याचे सामर्थ्य हे पराकोटीच्या निस्वार्थ प्रेमात असते जे तिच्यात होत आणि श्यामची आई ही तर कर्मयोगाच्या प्रखर भट्टीत अनुभवाने, अफाट कष्टाने तावून सुलाखून निघालेलं 24 कॅरेट शंभर नंबरी सोनंच होतं.   तिची अपार माया, प्रेम, वात्सल्य आणि ममता हे बांधून ठेवणार नव्हतं तर मोकळीक देणारं होतं.

बेस्टसेलर पुस्तकांच्या या अलौकिक पंक्तीत स्थान ग्रहण करण्याचे सामर्थ्य या पुस्तकाचे नक्कीच आहे. पण ते पुस्तक बेस्ट सेलर आहे हे ठरवण्याची सुद्धा माझी पात्रता नाही असं मला वाटतं. श्यामची आई म्हणजे संस्कारांची भरभक्कम शिदोरीच होती जी श्यामच्या आयुष्यभराला पुरली आणि आता वाचकांच्या आयुष्यभराला पुरेल. श्यामच्या आईने श्यामवर योग्य त्या सर्वच संस्कारांचे बीजारोपण वेळोवेळी, पदोपदी, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर केले. पण जसा श्याम घडण तिला अपेक्षित होतं अगदी तसाच तो घडला का? श्याम म्हणजे कृष्ण. कर्मयोगावर चालत असताना या धूर्त आणि लबाड जगात वावरताना जो या जगाची लबाडी ओळखेल आणि थोपवेल असा श्याम तिला कदाचित अपेक्षित असावा. "द्रौपदीसी बंधू शोभे नारायण" या गाण्यातील नारायण अर्थातच कृष्णरुपी श्याम तिला अपेक्षित असेल. पण हा श्याम फक्त प्रेम, माया, वात्सल्य, उदारता आणि हळवेपणाने युक्त असा घडला. स्वातंत्र्यसंग्राम किंवा स्वातंत्र्योत्तर काळात मनाने अत्यंत हळवा आणि ह्रदयाने अत्यंत सद्गतीत असलेला श्याम हा या लढाईत थकलेला किंवा भौतिक परिस्थितीने उद्विग्न झालेला बघावयास मिळतो. पण हा यश्वदेचा श्याम असल्याने ते प्रेम, ती आपुलकी, माया ही त्याच्या ठायी ही तितकीच अपार होती. लीला करणाऱ्या किंवा पराक्रमी कृष्णाऐवजी या श्यामने कदाचित योगेश्वर कृष्ण होणं अधिक पसंत केलं असावं. या किंवा कुठल्याही बेस्ट सेलर पुस्तकाचे अंतरंग हे त्याच्या किती आवृत्ती निघाल्या, आपल्या पुस्तकाच प्रमोशन अलका कुबल-आठल्ये किंवा इतर कोणी अभिनेता-अभिनेत्री करतेय का? किंवा बाजारात त्याला काय किंमत मिळाली आणि त्याच्या किती प्रति वितरीत झाल्या याने कधीच आनंदित होत नसतं. किती अधिक जणांनी हे पुस्तक वाचलंय त्याहीपेक्षा जितक्या जणांनी हे पुस्तक वाचलंय त्यातल्या काहींच पाषाणरुपी ह्रदय द्रवलंय, पाझरलय का? किंवा श्यामची आई वाचताना एखाद्याच अंतरंग हे जशी तुरटी फिरवावी याप्रमाणे खरंच ढवळून निघालं आहे का किंवा शुद्ध झालं आहे का? त्या पुस्तकाने आपल्या मनाचा ठाव घेतला आहे का? किंवा ते वयाच्या कुठल्याही टप्प्यावर वाचताना आयुष्याला एक नवकलाटणी, दिशा व प्रेरणा मिळाली आहे का यानेच त्या पुस्तकाची योग्यता ही बेस्टसेलर म्हणून सिद्ध होत असते. श्यामची आई (श्यामच्या मुखातून) वाचत असताना काही काळ मन हेलावतं किंवा ह्रदय सद्गतीत होतं तर साक्षात श्यामची आई ही मुळात किती अतिदिव्य असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही. श्यामची आई या पुस्तकाच्या बेस्ट सेलर असण्याची इति कर्तव्यता सुद्धा यातच असावी...

©® -आनंद लेले..✒️
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YURNCV
Similar Posts
7 Ways to Retain More of Every Book You Read There are many benefits to reading more books, but perhaps my favorite is this: A good book can give you a new way to interpret your past experiences.
प्रत्येकाने 'ही' पाच पुस्तकं वाचलीच पाहिजेत! - गौर गोपाल दास यांचा व्हिडिओ पुस्तक वाचन ही आयुष्यात किती महत्त्वाची गोष्ट आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कोणती पाच पुस्तकं वाचणं अत्यावश्यक आहे, याबद्दल आध्यात्मिक गुरू गौर गोपाल दास यांनी व्यक्त केलेले विचार...
WHY YOU SHOULD START READING 1. READ TO Acquire knowledge. 2. READ TO Improve memory. 3. READ TO Strengthen your critical and Analytical skills.
‘यूएई’त वाचक तितुका मेळवावा!! ‘ग्रंथ तुमच्या दारी’च्या ‘यूएई’ विभागाने ११ ऑक्टोबर २०१९ रोजी दुबईत वाचन प्रेरणा दिवस साजरा केला. ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे या वेळी उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमाचा हा वृत्तांत...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language